इंदापूरमधील राजकीय पेच निवळणार; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेवर निवडीची शक्यता..!

इंदापूर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर इंदापूरमध्ये विधानसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार हा पेच निर्माण झाला होता. मात्र आता हा पेच निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच इंदापूरमधील राजकीय पेच संपण्याची चिन्हे आहेत.
२०१९ साली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. मागील वर्षभरापूर्वी अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-सेना युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंदापूरमध्ये विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबतच्या चर्चा रंगत होत्या.

दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं जाहीर केलं होतं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यातच इंदापूरमध्येही महायुतीचे नेते एकत्र आल्याचा परिणाम दिसला नाही. अशात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते.
दरम्यान, १२ जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये विधानसभेच्या जागेवरून असणारा वाद शमण्याची चिन्हे आहेत. हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेत संधी मिळाल्यास दत्तात्रय भरणे यांना विधानसभेत पाठवले जाईल. त्यामुळे तूर्तास तरी महायुतीत इंदापूरच्या जागेवरून निर्माण झालेला पेच निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!