इंदापूर : न्यूज कट्टा
इंदापूरमधून महायुतीकडून विधानसभेची उमेदवार कोणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र विद्यमान या नितीनुसार ही जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसलाच मिळेल अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता त्यांच्या नागरिक संवाद कार्यक्रमाच्या पोस्टमधून कमळ चिन्ह गायब झाले आहे. त्यातच पालखी सोहळ्यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरच तुतारी वाजवली गेली. त्यामुळे सध्या हर्षवर्धन पाटील यांच्या मनात काय सुरू आहे याचीच चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०२४ मध्ये पुन्हा लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी तयारी केली होती. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीत सहभाग घेतला. त्यामुळे इंदापूरमध्ये महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या काळात हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला मान्यता देणार असल्याचं सांगितलं होतं. इंदापूरमध्ये नुकताच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरच तुतारी वाजवण्यात आली. त्यावेळीही हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी असा आग्रह कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. याच काळात इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या बॅनरवरून कमळ चिन्ह गायब झाले होते.
दरम्यान, गुरुवार दि. १८ जुलै रोजी हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील निवासस्थानी नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. याबाबत समाजमाध्यमात शेअर केलेल्या पोस्टमधूनही कमळ चिन्ह गायब झाले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचाच थांगपत्ता लागत नसल्याची चर्चा असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात याबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे.





