जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था
जम्मूच्या कठूआमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. जम्मूतील मछेडी परिसरात लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकून गोळीबार केला आहे. यामध्ये चार जवान शहीद झाले आहेत. तर अन्य चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर लष्कराच्या पथकांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
मछेडी परिसरात लष्कराचे वाहन जात असताना हा हल्ला झाला. हे वाहन जात असताना टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. त्यानंतर या वाहनावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र या घटनेत चार जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. तर चार जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने तात्काळ दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे दहशतवादी हल्ल्याची ही दुसरी घटना असून रविवारी राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती.





