मुंबई : न्यूज कट्टा
पाऊस न पडल्याने राज्याच्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. राज्यातल्या एकाही तालुक्यात किंवा खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभा सदस्य राजेश टोपे आणि जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्या राज्यात साधारणपणे जून महिन्यात पाऊस पडतो. त्यामुळे ३० जूनपर्यंत टँकर सुरु ठेवण्यात येतात. परंतु अद्यापही राज्याच्या काही भागात पाऊस पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा तालुक्यात किंवा गावात ३० जूननंतरही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील.
राज्यातील कुठल्याही खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. याबाबतही त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले. तसेच पाणीटंचाईबाबत स्थानिक पातळीवर तातडीच्या उपाययोजना राबावण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी सभागृहात दिली.





