मुंबई : प्रतिनिधी
१२ जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेसाठी राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. अजितदादांनी लोकसभा निवडणुकीवेळी राजेश विटेकर यांना आमदार करू असा शब्द दिला होता. दरम्यान, आज विधानपरिषदेच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
१२ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. सध्याचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीच्या ९ जागा आणि महाविकास आघाडीच्या दोन जागा निवडून येतील अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत.
अजितदादांनी आपल्या पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. राजेश विटेकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. त्यांनी तशी तयारीही केलेली होती. मात्र महादेव जानकर यांना परभणीची उमेदवारी देण्यात आल्यामुळे राजेश विटेकर यांना थांबावं लागलं. त्यावेळी अजित पवार यांनी विटेकर यांना विधानपरिषदेत संधी देऊ असा शब्द दिला होता.
दुसरीकडे शिवाजीराव गर्जे हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील पक्ष कार्यालयाची सर्व जबाबदारी गर्जे यांच्याकडेच आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर गर्जे यांनी अजितदादांची साथ दिली आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना गर्जे यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाणार होती.





