साताऱ्यातील भाजपच्या ‘या’ आमदारांच्या अडचणी वाढल्या; कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे सातारा जिल्ह्यातील आमदार जयकुमार गोरे यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना कालावधीत आमदार जयकुमार गोरे यांनी मृत व्यक्ती जीवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल केली असून दि. ५ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे.

आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. दोनशेपेक्षा जास्त मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून शासकीय योजनेतून मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात आल्याचा गंभीर आरोप यामध्ये करण्यात आला आहे. याचिकाकर्ते दीपक देशमुख हे खटाव तालुक्यातील मायणी येथील रहिवासी आहेत. जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटरचे खजिनदार अरुण गोरे, राकेश मेहता, महेश बोराटे, प्रवीण औताडे, अनिल बोराटे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सागर खाडे यांनी हा भ्रष्टाचार केल्याचे नमूद करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेद्वारे केली आहे.

खटाव तालुक्यातील मायणी येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर आहे. कोरोना काळात हे सेंटर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे हे होते. त्यांनी डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रांचा वापर करत मृत व्यक्तींच्या नावाने राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा गैरफायदा घेतल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
या सर्वांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्यावर स्थानिक पातळीवर गुन्हा दाखल होत नसल्याचेही देशमुख यांनी या याचिकेत नमूद केले आहे. दरम्यान, या याचिकेवर दि. ५ जुलै रोजी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!