मोठी बातमी : निंबूत गोळीबार प्रकरण; रणजीत निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात..!

बारामती : प्रतिनिधी
बैलगाडा शर्यतीत प्रसिद्ध असलेल्या सुंदर बैलाच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांची हत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील निंबूत येथे घडली होती. त्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपी गौतम काकडे हे फरार होते. या प्रकरणी आता या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या गौतम काकडे यास पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री उशीरा गौतम काकडे याला भोर परिसरात अटक करण्यात आली.
बैलगाडा शर्यतीत प्रसिद्ध असलेल्या गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्याकडून सुंदर हा बैल खरेदी केला होता. त्यापोटी गौतम काकडे यांनी ५ लाख रुपये निंबाळकर यांना दिले होते व उर्वरीत ३२ लाख रुपये नंतर देण्याचे ठरवण्यात आले होते. त्यातूनच गुरुवारी रात्री रणजीत निंबाळकर यांनी आपल्या पत्नी व मित्रांसमवेत निंबूत येथे गौतम काकडे यांच्या घरी येत व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले.
गौतम काकडे यांनी संबंधित कागदपत्रांवर सह्या करा, तुम्हाला उद्या सकाळीच पैसे मिळतील असं उत्तर रणजीत निंबाळकर यांना दिलं. मात्र रणजीत निंबाळकर यांनी तुम्ही मला आता पैसे द्या मी लगेच सह्या करतो. अन्यथा मी विसार म्हणून घेतलेली रक्कम परत करत बैल घेऊन जातो अशी भूमिका घेतली. हा वाद सुरू असतानाच गौतम काकडे यांनी त्यांचे भाऊ गौरव काकडे व अन्य मुलांना बोलावून घेतले. त्यांनी रणजीत निंबाळकर यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्याचवेळी गौरव यांनी तू बैल कसा नेतो तेच बघतो, तुला जीवंतच ठेवत नाही असं म्हणत त्यांच्याकडील पिस्तुलातून रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात एक गोळी झाडली.
या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तात्काळ गौरव काकडे आणि शहाजीराव काकडे यांना अटक केली होती. मात्र गौतम काकडे हे या घटनेनंतर फरार झाले होते. या दरम्यान, रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि रणजीत निंबाळकर यांच्या चाहत्यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गर्दी करत गौतम काकडे यांना अटक करण्याची मागणी केली होती.
रणजीत निंबाळकर यांच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि चाहत्यांचा रोष वाढत होता. गौतम काकडेला तात्काळ अटक करा अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी भूमिका त्यांनी घेतली होती. गौतम काकडे याच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथके रवाना केली होती. अखेर काल रविवारी रात्री उशीरा भोर परिसरातून गौतम काकडे याला अटक करण्यात आली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!