बारामती : न्यूज कट्टा
संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. उद्या शनिवार दि. ६ जुलै रोजी ही पालखी बारामती शहरात मुक्कामी असणार आहे. रविवार दि. ७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. बारामती ते काटेवाडी या दरम्यान अजितदादा स्वत: चालत या पालखी सोहळ्यात सहभाग घेणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावर्षी संत तुकाराम महाराजांच्या पायी वारीत सहभाग घेणार आहेत. आज विधानसभेत त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. अनेकांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा मोह होत असतो. त्यामुळे आपणही यावर्षी बारामतीतून काटेवाडीपर्यंत चालत या पालखी सोहळ्यात चालणार असल्याचं अजितदादांनी सांगितलं. उद्या संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात मुक्कामी असणार आहे. रविवारी सकाळी ही पालखी बारामतीतून निघून काटेवाडी येथे विसाव्यासाठी पोहोचणार आहे.
संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती तालुक्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी उंडवडी येथील मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा बारामती शहरातील मुक्कामासाठी दाखल होईल. त्यानंतर रविवारी सकाळीच ही पालखी काटेवाडीकडे मार्गस्थ होणार आहे. काटेवाडीत नेहमीच्या परंपरेनुसार पालखीचे धोतरांच्या पायघड्यांनी स्वागत केले जाणार आहे. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सणसरकडे मार्गस्थ होत असताना काटेवाडीत मेंढ्यांचे रिंगण होणार आहे.





