नाशिक : न्यूज कट्टा
संपत्तीच्या वादातून कोण काय करेल हे सांगता येत नाही. संपत्तीपुढे नातीही फिकी ठरतात हे दाखवारी एक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली आहे. जमीन आणि विहीरीच्या वादातून सख्ख्या भावाने व पुतण्यांनी ८० वर्षीय वृद्ध भावाच्या अंगावर डिझेल टाकत जीवंत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कचेश्वर महादू नागरे असे या घटनेतील मृताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथील नागरे कुटुंबातील दोघा भावांमध्ये वडीलोपार्जित जमीन आणि विहीरीवरून वाद सुरू होता. अनेकदा यातून दोघांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत होते. त्यातूनच मागील दोन वर्षांपूर्वी निफाड पोलिस ठाण्यात हे प्रकरण गेले होते. मात्र तरीही यावर तोडगा निघालेला नव्हता. उलट सातत्याने या वादाची धग वाढत चालली होती.
मंगळवारी सकाळच्या वेळी कचेश्वर नागरे हे आपल्या घरासमोर स्वच्छता करत होते. त्यावेळी घराबाहेर कोणीही नसल्याचे पाहून कचेश्वर नागरे यांच्या लहान भावासह पुतण्यांनी त्यांच्या अंगावर डिझेल टाकत जीवंत पेटवून दिले. काही समजण्याच्या आत नागरे हे आगीच्या ज्वालात वेढले होते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरातील सदस्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी आग विजवून कचेश्वर यांना निफाड येथील शासकीय रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ९५ टक्के भाजल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कचेश्वर यांचे भाऊ आणि पुतणे फरार झाले आहेत. निफाड पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.





