मुंबई : न्यूज कट्टा
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने झेंडा रोवला आहे. महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजेच नऊ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याचवेळी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार फुटतील अशी चर्चा असताना आपले दोन्ही उमेदवार निवडून आणत आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. दरम्यान, या निकालानंतर कॉँग्रेसची मते फुटल्याची चर्चा रंगू लागली आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाणे, शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर हे रिंगणात होते.
या निवडणुकीदरम्यान, अजितदादांचे आमदार फुटतील अशी चर्चा झडत होती. मात्र अजितदादांनी आपले दोन्ही उमेदवार निवडून आणून आपले कसब दाखवून दिले आहे. या निवडणुकीत राजेश विटेकर यांना २३ आणि शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली आहेत. याबद्दल प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, शिवसेनेच्या कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष होतं. आमच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात होत्या. वास्तविक आमच्याकडे ४२ मते होती. मात्र योग्य नियोजनामुळे आमचा या निवडणुकीत विजय झाला आहे. महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या सर्व आमदारांचे आभार मानत अजित पवार यांनी यापुढील काळातही महायुती विधानसभेला एकत्रित लढून बहुमत मिळवेल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने आपले तीनही उमेदवार निवडून येतील असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत हाती आलेल्या निकालात कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातव या विजयी झाल्या आहेत. तर शेकापच्या जयंत पाटील यांना सर्वात कमी मते मिळाली आहेत. अनाहूतपणे आलेल्या मिलिंद नार्वेकर यांना मात्र २२ मते मिळाली आहेत.





