पुणे : न्यूज कट्टा
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला पुणे शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर पूजा खेडकरने मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. याच अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली असून उद्या पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या आपल्या थाटामुळे चर्चेत आल्या आहेत. स्वतंत्र वाहनासह निवास व्यवस्था आणि कार्यालयात स्वतंत्र कक्षासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या पूजाचे अनेक उद्योग आता समोर येत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पूजा खेडकरची पुण्यातून वाशिम येथे बदली करण्यात आली. मात्र आता पूजा खेडकरला वाशिम येथूनही कार्यमुक्त करण्यात आले आहे.
याचदरम्यान, पूजाने वाशिम पोलिसांकडे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात मानसिक छळाची तक्रार केली आहे. पूजाने वाशिम पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार वाशिम पोलिसांनी पूजाचा जबाब नोंदवून तो पुणे पोलिसांकडे वर्ग केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी पूजा खेडकरला नोटीस बजावत उद्या पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांबद्दल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांकडून या तक्रारीबाबत पूजाकडे चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे उद्या पूजा या चौकशीसाठी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर राहणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





