BIG BREAKING : अखेर वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरवर यूपीएससीकडून गुन्हा दाखल; निवड रद्द करण्याबाबतही बजावली नोटीस..!

पुणे : न्यूज कट्टा

आपल्या कृत्यांमुळे चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. बोगस प्रमाणपत्रांसह नाव बदलून यूपीएससीची परीक्षा दिल्यामुळे पूजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तुमची निवड रद्द का करू नये अशा आशयाचं कारणे दाखवा नोटीसही केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून बजावण्यात आले आहे. त्यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात गेला आहे.

प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर पूजा खेडकरने अनेक अवास्तव मागण्या केल्या. त्याचवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कार्यालयच काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पूजाने खोटी प्रमाणपत्रे जोडून आणि नाव बदलून यूपीएससीची परीक्षा दिल्याचेही प्रकार समोर आले आहेत. दररोज नवनवीन उद्योग बाहेर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, कार्मिक मंत्रालय आणि मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीने दखल घेत अहवाल मागवला होता.

दरम्यानच्या काळात वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पूजा खेडकरला कार्यमुक्त करण्याचे निर्देश लालबहादूर शास्त्री अकॅडमीकडून देण्यात आले होते. त्यानंतर आता पूजावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुन्हा दाखल करत निवड रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पूजाने बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा आणि यूपीएससी परीक्षेत नाव बदलल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजाने अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून दृष्टीहीन व मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. त्याचबरोबर ४० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असतानाही ‘नॉन क्रिमेलीयर’ प्रमाणपत्र सादर केले होते. तसेच पिंपरी चिंचवड येथूनही अपंग प्रमाणपत्र मिळवले होते. या संपूर्ण प्रकरणाची केंद्र सरकारच्या समितीने चौकशी केल्यानंतर पूजावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरसमोरील अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!