बारामती : न्यूज कट्टा
जमिनीसंदर्भातील दाव्यात वरिष्ठ कार्यालयाने दिलेला स्थगिती आदेश जमा करून घेण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बारामती येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकारी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. अनिलकुमार संभाजी महारनवर असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, संबंधित तक्रारदार हे इंदापूर तालुक्यातील आहेत. त्यांच्या जमिनीबाबत सह निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे दावा सुरू होता. यामध्ये तक्रारदाराच्या मागणीनुसार जिल्हा उपनिबंधकांकडील आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. या स्थगिती आदेशाची प्रत जमा करण्यासाठी तक्रारदार हे बारामतीतील प्रशासकीय भवनात असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात गेले.
त्या ठिकाणी या कार्यालयातील सहकारी अधिकारी अनिलकुमार संभाजी महारनवर (वय ४६, रा. ढेकळवाडी, ता. बारामती) यांनी ही प्रत स्वीकारण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तक्रारदार पुन्हा सहाय्यक निबंधक कार्यालयात गेले. त्या ठिकाणी महारनवर यांच्याशी झालेल्या चर्चेत ५ हजाराऐवजी साडेचार हजार रुपये देऊन संबंधित स्थगिती आदेश जमा करून घेण्याचं ठरलं.
शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच घेताना अनिलकुमार महारनवर यास रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने थेट बारामती प्रशासकीय भवनात सापळा रचत ही कारवाई केली आहे. त्यामुळे प्रशासकीय भवनात विशेषत: शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.





