निरा : न्यूज कट्टा
पुणे जिल्ह्यासह धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. वीर धरणाची पाणी पातळी सध्या ५७९ मीटर इतकी झाली असून या धरणाच्या सांडव्याद्वारे निरा नदीत सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. ४६३७ क्युसेसने सुरू असलेला विसर्ग आता १४ हजार ९११ क्युसेस इतका करण्यात आला आहे. दरम्यान, पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे निरा नदीकाठच्या गावांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यासह धरण क्षेत्रात कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वीर धरणातही पाणी पातळी वाढत असून ती ५७९ मीटर इतकी झाली आहे. पावसाचं प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेता निरा नदीतील विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. सध्या निरा नदीत १४ हजार ९११ क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे.
पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे कोणीही नदीत उतरू नये, तसेच नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवावीत, सखल भागातील तसेच नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





