पुणे : न्यूज कट्टा
पुणे शहरात काल गुरुवारी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड कसरतही करावी लागली. दिवसभरात पावसाचं रौद्ररूप पुणेकरांनी अनुभवलं. आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काल दिवसभरात पावसामुळे तब्बल सहाजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
काल पुण्यात पावसाचं अक्षरश: थैमान पाहायला मिळालं. शहरातील अनेक भागांमध्ये कमरेइतके पाणी साचले होते. पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागला. आजही हवामान विभागाने पुण्यासह जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबवल्या जात आहेत. आज या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, कालच्या पावसामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात सहाजणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शहरातील डेक्कन परिसरातील पूलाचीवाडी येथे विजेचा शॉक बसून तिघांचा मृत्यू झाला. तर कात्रज येथील तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ताम्हिणी घाटातही एकाचा बळी गेला.





