बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरानजीक असलेल्या वंजारवाडीत एका विवाहितेला लुटून तिचे अर्धनग्न फोटो काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून या विवाहितेकडील सोन्याचे दागिने लुटून अज्ञात तिघांनी पोबारा केला. या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून बारामती तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी वंजारवाडी येथे वास्तव्यास असलेली विवाहिता आपल्या आईकडे गेली होती. तेथून पुन्हा रुईच्या दिशेने वंजारवाडी येथील पालखी मार्ग चौकात पायी चालत असताना ही विवाहिता जवळच असलेल्या शेतात लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी एकाने पाठीमागून येवून त्याच्याकडील चाकू या विवाहितेच्या गळ्याला लावत तिच्याकडील १ तोळा वजनाचं मनी मंगळसूत्र, ३.५ ग्रॅम वजनाची अंगठी, ४ ग्रॅम वजनाचे झुमके असे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले.
त्याचवेळी आणखी दोन इसम त्या ठिकाणी आले. एकाने या विवाहितेचं तोंड दाबून मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर या विवाहितेला कपडे काढण्यास सांगितले. मात्र त्यास नकार दिल्यानंतर या तिघांनी तिच्या अंगावरील ओढणी फेकून देत टॉप फाडून टाकला. त्यानंतर तिला पॅन्टही उतरवण्यास भाग पाडलं. त्यानंतर त्यांनी या विवाहितेचे अर्धनग्न फोटो काढले. मोबाईलमुळे कुटाणा होईल असं म्हणत या विवाहितेचा मोबाईल त्याच ठिकाणी टाकून या तिघांनी पोबारा केला.
या प्रकरणी संबंधित विवाहितेच्या फिर्यादीनंतर बारामती तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ ते ३२ वर्षे वय असलेल्या या आरोपींचे वर्णन या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली असून बारामती तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याची चर्चा या निमित्तानं होत असून आता या घटनेतील आरोपींचा शोध कधी लागतो याकडेच लक्ष लागले आहे.





