दौंड : न्यूज कट्टा
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसानंतर भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. अशातच आता दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पाण्यात भली मोठी मगर आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून ही मगर नदीपात्रातच राहणार की पुढे उजनी धरणाकडे जाणार याचीच चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे.
धरणक्षेत्रात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मूळा-मुठा नदीतून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी भीमा नदीतून थेट उजनी धरणात जाते. परंतु काल दौंड तालुक्यात नदीपात्रात भली मोठी मगर आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दौंड तालुक्यातील आलेगाव ते देऊळगाव राजे या दोन गावांच्या मध्यभागी काही शेतकऱ्यांना ही मगर आढळून आली. ही मगरच आहे का याची शहानिशा करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी दगड फेकला असता या मगरीने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यामुळं नदीपात्रात मगर आल्याचं निष्पन्न झालं असून शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
आता ही मगर भीमा नदीपात्रातच राहते की पाण्याच्या प्रवाहासोबत उजनी धरणात जाते याची चिंता आता शेतकरी वर्गाला लागली आहे. या मगरीकडून नदीकाठी दहशत माजवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच लोकांच्या वर्दळीच्या भागात या मगरीचा वावर राहिल्यास धोका होऊ शकतो. दुसरीकडे नदीपात्रात मच्छीमारी करणाऱ्यांनाही मगरीच्या वास्तव्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे सध्या तरी या सर्व घटकांमध्ये मगरीने दहशत निर्माण केली आहे.
पाच वर्षांपूर्वी पकडली होती मगर
मागील पाच वर्षांपूर्वी उजनी धरण परिसरात मगरींचे वास्तव्य आढळून आले होते. सुरुवातीला याकडे अफवा म्हणून पाहिले गेले. मात्र नंतर या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर खरोखरच दोन मगरी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी मगरी पकडण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने करमाळा तालुक्यातील कंदर येथे एक आणि उजनीच्या भीमा व्यवस्थापन विभागाच्या मत्स्यबीज केंद्रात एक अशा दोन मगरी पकडण्यात आल्या.





