पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा
मागील काही काळात ऑनलाईन गेमच्या नादात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता पिंपरी चिंचवडमध्येही एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या वेडापायी एका पंधरा वर्षाच्या मुलानं चौदाव्या मजल्यावरून उडी मारत स्वत:चं जीवन संपवलं आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरात ही घटना घडली आहे. आर्य श्रीराव असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. आर्य हा आपल्या आईसह किवळे येथील रूणाल गेटवे सोसायटीत वास्तव्यास होता. तो चिंचवड येथील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. अभ्यासात चुणचुणीत असलेला आर्य अत्यंत लाजाळू होता. मागील काही महिन्यांपासून त्याला ऑनलाईन गेमचं वेड लागलं होतं.
ब्लु व्हेलसारखी गेम खेळून त्याची चिडचिड वाढली होती. विशेष म्हणजे या गेमसाठी तो स्वत:ला घरात कोंडून घेत होता. कधीकधी तर तो दोन तीन दिवस स्वत:च्या खोलीतून बाहेरही येत नव्हता. त्यातूनच त्याने २५ जुलै रोजी रात्री राहत्या घराच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आर्यचे वडील हे नोकरीनिमित्त परदेशात असतात. या घटनेनंतर श्रीराव कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पिंपरी चिंचवड व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्ल्यू व्हेलसारख्या ऑनलाईन गेमवर बंदी असतानाही त्या उपलब्ध कशा होतात हा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. मागील काळात ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा या गेम मुलांना वेड लावत आहेत.





