इंदापूर : न्यूज कट्टा
इंदापूर शहरातील श्री. नारायणदास रामदास हायस्कूलमधील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शाळेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रथमेश विकास खबाले (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण इंदापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रथमेश खबाले हा इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. गुरुवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत आला आणि शाळेतील सामुहिक प्रार्थनेतही सहभागी झाला. त्यानंतर तो वर्गात बसल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली. शिक्षकांनी तातडीने त्याला इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर प्रथमेशचा मृतदेह इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करून हा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर इंदापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमेशच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शाळेला सुट्टी देण्यात आली. डोळ्यांदेखत प्रथमेशच्या मृत्यूमुळे उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अश्रू अनावर झाले.





