निरा : न्यूज कट्टा
पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वीर धरणाची पाणी पातळी वाढत आहे. त्याचबरोबर निरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी या धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. या तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वीर धरणातून २३ हजार १८५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवून रात्री ८ वाजता ३२ हजार ४५९ क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वीर धरणाची पाणी पातळी ५७९.४६ मीटर हि मागील काही तास स्थिर असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. तसेच आज सायंकाळी निरा देवघर धरण(९४.६५%),भाटघर धरण ९९.११% तर गुंजवणी धरण (८६.११%) इतके भरले आहे. त्यामुळे या तिन्ही धरणांतून विसर्ग वाढण्यास सुरूवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला २३१८५ क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता ३२४५९ क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार आहे. पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या नागरीकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





