नवी मुंबई : न्यूज कट्टा
प्रेमासाठी वाट्टेल ते अशी एक म्हण प्रचलित आहे. अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे. आपल्या प्रेयसीची हत्या करून स्वत:ही खाडीत उडी टाकून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील एनआरआय परिसरात ही घटना घडली असून यातील मृत तरुणीचा मृतदेह मिळून आला असून तरुणाचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही.
भाविका मोरे (वय १९, रा. सीवूड, नवी मुंबई) असं मृत तरुणीचं नाव आहे. तर सात्विक पाटील असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, भाविका आणि सात्विक हे दोघेही दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यातून जवळीक वाढल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद होऊन ते दोघेही वेगळे झाले होते.
दरम्यानच्या काळात दोघांमध्येही सातत्याने वाद होत होते. मंगळवारी हे दोघेही भेटले होते. त्यानंतर सात्विकने पुन्हा बुधवारी डीपीएस शाळेमागे भेटण्यासाठी बोलवले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्यातून सात्विकने भाविकाचा गळा आवळून तिची हत्या केली. जवळच असलेल्या छोट्या नाल्यात तिचा मृतदेह टाकून दिला होता. त्यानंतर त्याने काही अंतरावर असलेल्या पूलावरून खाडीत उडी मारली.
सात्विकला या परिसरात मासेमारी करणाऱ्या लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे तो वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी सात्विकच्या मृतदेहाचा शोध सुरू केला असून काल आणि आजही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.





