बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरात चायनीज मांजाची बेकायदेशीरपणे विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे. आज सकाळी या चायनीज मांजामुळे एका व्यावसायिकाचा गळा कापला गेल्याची घटना घडली आहे. नशीब बलवत्तर म्हणून या व्यावसायिकाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. दरम्यान, चायनीज मांजाची सर्रास विक्री होत असताना पोलिस यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, अनिल कायगुडे हे बारामती शहरात बांधकाम व्यवसाय करतात. आज सकाळी ते एमईएस शाळेकडून एमआयडीसीच्या दिशेने जात असताना चायनीज मांजा लागून त्यांचा गळा चिरला गेला. दुचाकीवर जात हा असताना मांजा दिसला नाही. त्यामुळे ही घटना घडली. यावेळी या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.
या घटनेनंतर बारामतीत मोठ्या प्रमाणात चायनीज मांजाची विक्री केली जात असल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी काही संघटनांनी चायनीज मांजाची विक्री करू नये यासाठी बारामती शहर पोलिसांना निवेदनही दिले आहे. मात्र पोलिसांकडून जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. या चायनीज मांजाचा अनेकांना त्रास सोसावा लागतो.
वाहन चालवत असताना हा मांजा दिसतही नाही. त्यातून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. परंतु पोलिसांकडून याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही, हे वास्तव आहे. या मांजामूळे काहीजणांना जीव गमवावा लागल्याच्याही काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. असं असताना बारामती शहरात पुन्हा हा चायनीज मांजा विक्रीसाठी येतोच कसा असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. दुसरीकडे मागणी करूनही पोलिसांनी चायनीज मांजाबाबत काहीच कारवाई केलेली नाहीत यामागे काही गौडबंगाल आहे का अशीही शंका उपस्थित होत आहे.





