बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरात काल दिवसभरात अनेकांना चायनीज मांजामूळे त्रास सोसावा लागला. तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर जागे झालेल्या बारामती शहर पोलिसांनी धाडी टाकत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या कारवाईत अपेक्षित साठाच मिळून आलेला नाही. त्यामुळे या जीवघेण्या मांजाबाबत आधीच योग्य ती खबरदारी घेऊन कारवाई का गेली नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.
बारामती शहरात चायनीज मांजाची बेकायदेशीरपणे विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे. काल सकाळी या चायनीज मांजामुळे एका व्यावसायिकाचा गळा कापला गेल्याची घटना घडली. तर दुपारी एका युवकाच्या गालासह मान चायनीज मांजामुळे कापली गेली. काही तासांच्या कालावधीत या दोन घटना घडल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिस यंत्रणेसह नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वास्तविक नागपंचमी सणापूर्वीच चायनीज मांजाची विक्री रोखण्यासाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र बारामती शहर पोलिस ठाणे आणि बारामती नगरपरिषदेने याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे बारामती शहरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांजाची विक्री झाली आणि त्याचा फटका वाहनचालकांना बसला. केवळ नशीब चांगले म्हणून काल दोघांचा जीव वाचला आहे. मात्र या मांजाच्या धारदारपणामुळे एकाचा गळा तर एकाच्या गालासह मान चिरली आहे. या दोन्ही जखमींवर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरात चायनीज मांजामूळे झालेल्या दुर्घटनांचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये कसबा येथील साठे चौकात सनी धनंजय गवळी, जामदार रोड येथील श्रीपाद चंद्रकांत ढवाण, साठेनगर येथील चेतन अनिल लोखंडे या तिघांकडून चायनीज मांजा जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात साठा मिळून आलेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून पुढेही कारवाई सुरू ठेवली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, कालच्या दुर्घटनेनंतर बारामती शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असला तरी अपेक्षित साठा मिळालेला नाही. त्यामुळे बारामतीत चायनीज मांजाचा पुरवठा कुणाकडून होतो याचा शोध घेऊन संपूर्ण साठा नष्ट करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आता पोलिस यात कितपत गांभीर्यपूर्वक कारवाई करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.





