राजगड : न्यूज कट्टा
राजगड तालुक्यातील पाबे घाट रस्त्यावरील रांजणे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्युत तारांची चोरी करण्यासाठी गेलेल्या टोळक्यातील एकाचा टॉवरवरून पडून मृत्यू झाल्यानंतर साथीदारांनी त्याचा मृतदेह पाबे खिंडीत दुर्गम डोंगरात पुरला. तब्बल २५ दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी मृतदेहांचा शोध सुरू केला आहे.
बसवराज पुरंत मंगनमनी (वय २२, सध्या रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, मुळ रा. तुळजापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असं या घटनेतील मृताचे नाव आहे. बसवराज हा आपल्या साथीदारांसह विद्युत तारांची चोरी करण्यासाठी रांजणे गावात गेला होता. टॉवरवर चढून लोखंडी ब्लेडच्या सहाय्याने वायर कापत असताना तो १५० फुटांवरून खाली कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्याचे साथीदार रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे (दोघे रा. पाबे, ता. राजगड) या दोघांनी त्याचा मृतदेह पाबे खिंडीतील डोंगरात पुरला. त्यांनंतर हे दोघेही पसार झाले. मागील महिन्यात दि. १३ जुलै रोजी ही घटना घडली होती. याबाबत गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी वेल्हे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. मात्र अद्याप या मृतदेहाचा शोध लागलेला नाही.
दरम्यान, दि. २३ जुलै रोजी बसवराजच्या कुटुंबीयांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणी आता बसवराज याच्यासोबत असलेल्या साथीदारांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला जाणार आहे. या दोघांना सोबत घेऊन वेल्हे व सिंहगड रोड पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे.





