पुणे : न्यूज कट्टा
पुणे शहरातील लोहगाव येथून १ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मेफेड्रॉन ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळून आल्यामुळे खळबळ उडाली असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाला लोहगाव परिसरात अंमली पदार्थांचा मोठा साठा घेऊन काहीजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरात सापळा रचला. तिघेजण रस्त्याच्या बाजूला संशयितरित्या उभे असलेले आढळले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना ४७१ ग्रॅम मेफेड्रॉन, ४ मोबाईल, दुचाकी, कार आणि वजनकाटा असा १ कोटी ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
पोलिसांनी हा माल जप्त करत श्रीनिवास संतोष गोदजे (वय २१ रा. धानोरी), रोहित शांताराम बेंडे (वय २१, रा. लोहगाव) आणि निमिष सुभाष आबनावे (वय २७, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, टिंगरेनगर, लोहगाव) या तिघांना अटक केली आहे. या तिघांकडेही पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला असून यात आणखी कोणाचा समावेश आहे का याचा शोध घेतला जात आहे. यातून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असून तरुणांमध्ये याचा वापर वाढल्याची चर्चा होती. त्यांनंतर पोलिसांनी ही कारवाई करत मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे.





