सिन्नर : न्यूज कट्टा
राज्यातील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जनसन्मान’ यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा सुरू केला आहे. या यात्रेचं सर्वत्र मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केलं जात आहे. आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे रथातून मिरवणूक काढत या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. यावर बोलताना अजितदादांनी लग्नावेळी राहिलेली इच्छा आज पूर्ण करून घेतली अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली.
गेल्या तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं विविध भागात दौरा करत आहेत. या दरम्यान, त्यांचं उत्साहात स्वागत होताना पाहायला मिळत आहे. त्याचवेळी यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज ना. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अनिल पाटील हे सिन्नर येथे दाखल झाले. त्या ठिकाणी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून अजितदादांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची रथात बसवून मिरवणूक काढण्यात आली.
याबद्दल बोलताना अजितदादा म्हणाले, मी इथे आलो, लग्नात नववधू आणि वराला ज्याप्रमाणे रथात बसवतात तसं आज मला बसवलं होतं. त्यावेळी मनात म्हटलं की ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी घोड्यावर बसवलं नाही, रथ तर बाजूलाच राहिला. आता माणिकराव रथात बसवत आहेत. आमचं त्यावेळी राहून गेलं होते ते आज पूर्ण करून घेतलं. माझ्यासोबत सुनील तटकरे, अनिल पाटील यांनीही हौस पूर्ण करून घेतल्याचं अजितदादांनी सांगितलं. अजितदादांच्या या कोटीवर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
विकास आणि आम्ही राबवत असलेल्या योजनांबद्दल माहिती देण्यासाठी ही जनसन्मान यात्रा काढल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं. आम्ही काम करणारी माणसं आहोत. दिलेला शब्द पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. आपल्या समाजात असलेली गरीबी हटवण्यासाठी म्हणून लाडकी बहीण योजना आणली असून ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. काहीही झालं तरी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.





