धाराशीव : न्यूज कट्टा
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाने आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या करत मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना धाराशीव जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर धाराशीव हादरून गेला असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंतरगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे असं या आरोपीचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, दि. ८ ऑगस्ट रोजी विजय आणि त्याचे वडील विक्रम यांच्यात क्षुल्लक कारणातून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात विजयाने वडिलांची हत्या केली. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने वडिलांचा मृतदेह नदीत फेकून दिला.
दोन दिवसांनी ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी मुलानेच वडिलांचा खून केल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिस त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी विजयने हातात असलेलं लोखंडी शस्त्र पोलिसांवर उगारत पळ काढला. पोलिसांनी तीन ते चार किमी पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, अटकेनंतर आपण रागाच्या भरात वडिलांची हत्या केल्याची कबुली विजयने दिली आहे. परंडा पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा दाखल केला आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.





