पुणे : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर जनसन्मान यात्रा सुरू केलेली असतानाच आता बारामती विधानसभा निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. बारामतीत कार्यकर्त्यांची मागणी असेल तर पक्षाची संसदीय समिती जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत विचार करून निर्णय घेईल असं विधान अजितदादांनी केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून संभाव्य उमेदवारांबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत पुण्यात पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर अजितदादांनी लोकांची मागणी असेल तर पक्षाची संसदीय समिती याबाबत निर्णय घेईल आणि उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब करेल असं म्हटलं आहे. त्याचवेळी मी आजवर सात ते आठवेळा निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा कल असेल तर त्या पद्धतीने निवडणुकीत उतरण्याची तयारी असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग सात वेळा बारामती विधानसभेतून प्रतिनिधीत्व केले आहे. या निवडणुकीत अजितदादा बारामतीतून न लढता त्यांच्या जागी जय पवार यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा गेली अनेक दिवस होत आहे. अशातच जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजितदादांनी मोठं विधान केल्यामुळे बारामतीत नेमकं उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अजितदादांची राजकीय खेळी नेमकी काय असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.





