बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर रक्षाबंधनापूर्वीच दोन महिन्यांची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी केलेला वादा खरा करून दाखवल्यामुळे बारामती शहरातील महिला भगिनींनी आनंद व्यक्त करत अजितदादांना २५ हजार राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला राज्यभरातून महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या अनुषंगाने अजितदादाही जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरत महिलांसह समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. या योजनेचा प्रत्येक पात्र महिलांना लाभ मिळावा, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत.
बारामतीमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्वत: ना. अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक
घेऊन तशा सूचना दिल्या आहेत. विशेषत: बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबावण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे बारामती शहर आणि तालुक्यातून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दरम्यान, १७ ऑगस्टपासून या योजनेची रक्कम जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच ही रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामतीतील महिला भगिनींनी आनंद व्यक्त करत अजितदादांनी आपला शब्द खरा ठरवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. समस्त महिला वर्गाला अजितदादांकडून मिळालेली ही रक्षाबंधनाची भेट समाधानकारक असल्यामुळे बारामती शहरातील महिलांकडून २५ हजार राख्या अजितदादांना पाठवण्यात येणार असल्याचे महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहाराध्यक्षा अनीता गायकवाड यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केल्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बोले तैसा चाले..या उक्तीप्रमाणे नेहमीच अजितदादांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांना दादांचा नेहमीच अभिमान वाटतो, असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.





