CRIME BREAKING : पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक; बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यासह सातजणांवर वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..!

इंदापूर : न्यूज कट्टा   

तुमच्या सर्व अडचणी दूर करून पैशांचा पाऊस पाडतो असं आमिष दाखवत पूजापाठ, जादूटोणा करणाऱ्या टोळक्याने १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांवर वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेत लाच प्रकरणात बडतर्फ असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग असून त्याने आपल्या वर्दीचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी उत्तम लक्ष्मण भागवत (रा. घोलपवाडी, ता. इंदापूर) आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी माणिक गदादे या दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत पाच आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. सतीश कृष्णा मांडवे (रा. श्रीपूर, ता. माळशिरस) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १० जून २०२४ ते १७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी मांडवे हे व्यक्तिगत अडचणीमुळे तणावात होते. अशातच त्यांची भेट इंदापूर परिसरात भोंदूगिरी करणाऱ्या उत्तम भागवत याच्याशी झाली. भागवत याने आपण पैशांचा पाऊस पाडतो, तसेच तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकतो असं आमिष दाखवलं. त्यामुळं मांडवे यांनीही त्यांना वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात जवळपास १२ लाख ९८ हजार रुपये दिले.

भागवत आणि त्याचे साथीदार घोलपवाडी येथील राहत्या घरात वेगवेगळ्या पूजा विधी आणि जादू टोणा करत होते. लवकरच तुमच्या अडचणी संपतील आणि इथे पैशांचा पाऊस पडेल असं फिर्यादीला सातत्याने भासवलं जात होतं. मात्र हा फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याचं मांडवे यांच्या उशीरा लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी आपले पैसे परत द्यावेत यासाठी भागवत याच्याकडे तगादा लावला. त्यावर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर भूतबाधा करून जीवाचं बरंवाईट केलं जाईल अशी धमकी देण्यात आली.

या सर्व प्रकरणात या टोळक्याला लाच प्रकरणी बडतर्फ असलेल्या पोलिस कर्मचारी माणिक गदादे याची साथ मिळत होती. त्याने पोलिस गणवेश घालून बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची बतावणी केली. तसेच या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात मदत करतो असं सांगत ३ लाख रुपयांची मागणी केली. यातील दीड लाख रुपये रोख स्वरूपात घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या घटनेनंतर वालचंदनगर पोलिस ठाण्यात भोंदू उत्तम भागवत आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी माणिक गदादे याच्यासह एकूण सातजणांवर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील उत्तम भागवत आणि माणिक गदादे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना इंदापूर येथील न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करत आहेत.

बडतर्फ पोलीसाचा असाही उद्योग

या प्रकरणात माणिक गदादे या बडतर्फ पोलीसाचाही समावेश आढळून आला आहे. यापूर्वी माणिक गदादे याने चोरीच्या गुन्ह्यात समावेश असल्याचं सांगत बार्शी येथून स्कार्पीओ कार ओढून आणली होती. त्यावेळी ही कार सोडण्यासाठी बारामती येथील न्यायालयाच्या आवारात ५० हजार रुपयांची लाच घेताना गदादे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी खातेनिहाय चौकशीत गदादे याला बडतर्फ करण्यात आले आहे. आता जादूटोणा प्रकरणात तर चक्क बडतर्फ असताना वर्दी घालून गदादे याने मोठी रक्कम स्वीकारली आहे. त्यामुळे पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!