नीरा : न्यूज कट्टा
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील पाणी पातळी वाढत आहे. भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या वीर धरणातून ७१ हजार ३४९ क्युसेस इतका विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरण १०० टक्के भरले आहे. त्यातच पावसाचा जोर वाढत असल्याने पाणी पातळी वाढत आहे. तसेच नीरा देवघर धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या भाटघर, निरा देवघर आणि गुंजवणी धरणाच्या सांडव्यावरून तसेच विद्युतगृहाद्वारे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस वाढला आहे. परिणामी वीर धरणातून नीरा नदीत ६१ हजार ९२३ क्युसेसने सुरू असलेला विसर्ग वाढवून ६९ हजार ९९९ क्युसेस इतका करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या नीरा नदीतून ७१ हजार ३४९ क्युसेस इतका विसर्ग सुरू असणार आहे.
दुसरीकडे नीरा डाव्या कालव्याच्या अतिवाहकातून ३५० क्युसेस विसर्ग सुरू असून नीरा उजव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे १ हजार क्युसेस विसर्ग सुरू आहे. पावसाच्या स्थितीनुसार नीरा नदीतील विसर्गात बदल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य टी खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.





