बारामती : न्यूज कट्टा
मागील काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये गांवभेट दौरा करत आहेत. कालही त्यांनी बारामती तालुक्यातील जिरायत भागात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दरम्यान, बाबुर्डी गावात जय पवार यांनी ट्रॅक्टर बालचमू आणि कार्यकर्त्यांसह स्वत: ट्रॅक्टर चालवत जलपूजनासाठी जाऊन आपल्या साधेपणाचं दर्शन घडवलं.
लोकसभा निवडणुकीपासून युवा नेते जय पवार हे राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर जय पवार यांनी बारामतीकडे विशेष लक्ष दिले असून ते बारामती शहर आणि तालुक्यात सातत्याने दौरे करत संवाद साधत आहेत. काल जय पवार यांनी बारामती तालुक्यातील मूर्टी, मोरगाव, बाबुर्डी, जळगाव सुपे या गावांना भेटी देत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गावात सुरू असलेल्या कामांची माहितीही घेतली. तसेच ग्रामस्थांच्या अडीअडचणीही समजून घेतल्या.
बाबुर्डी गावात जय पवार यांचे ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. येथील महिलांनी राखी बांधत जय पवार यांचं स्वागत केलं. तसेच अजितदादांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल आभारही मानले. याच दरम्यान, जय पवार यांच्या हस्ते बाबुर्डी बंधाऱ्यावर जलपूजन केले. गावातून जलपूजनासाठी जाताना जय पवार यांनी थेट ट्रॅक्टरचं स्टेअरिंग आपल्या हाती घेत बालचमू आणि कार्यकर्त्यांसह बंधाऱ्यावर जाणं पसंत केलं. त्यांचा हा साधेपणा उपस्थित ग्रामस्थांना विशेष भावणारा ठरला.
यावेळी बाबुर्डीचे सरपंच दत्तात्रय ढोपरे, धनंजय खोरे, राजेंद्र खोरे, संजय खोरे, विजय खोरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, पोलिस पाटील राजकुमार लव्हे, गोविंद बाचकर, बाळासाहेब शेंडे, गणेश जुन्नरकर आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.





