पुणे : न्यूज कट्टा
पुणे शहरात एका अज्ञात तरुणीचा निर्घृण पद्धतीने खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे केल्याचं समोर आलं आहे. खराडी येथील नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला आहे. यामध्ये या तरुणीचे हात, पाय आणि डोकं कापून उर्वरीत धड नदीत फेकून देण्यात आलं आहे. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे शहरातील खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. या ठिकाणापासून जवळच असलेल्या नदीपात्रात हात, पाय आणि डोके नसलेले तरुणीचे धड आढळून आले. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी या तरुणीचा निर्घृण पद्धतीने खून करून तिचे हात, पाय आणि डोकं कापून टाकल्याचा प्रकार समोर आला. १८ ते ३० वयोगटातील ही तरुणी असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
संबंधित तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धारदार शस्त्राचा वापर करून या मृतदेहाच्या धडापासूनचे शीर, तसेच खांद्यापासून दोन्ही हात आणि खुब्यापासून दोन्ही पाय कापून टाकल्याचे आणि त्यानंतर हे धड मुळा-मुठा नदीपात्रात टाकून दिल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांकडून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. इतक्या निर्दयी पद्धतीने एका तरुणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे गेले आहेत. त्यामुळे या तरुणीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याचवेळी यातील आरोपीचा शोध घेऊन खूनाचं कारण शोधणेही पोलिसांसाठी जिकिरीचे ठरणार आहे.





