BARAMATI RTO : बारामतीच्या आरटीओ अधिकाऱ्याचा थाटच न्यारा; टोलनाक्यावर गाडी सोडली नाही म्हणून कर्मचाऱ्याला काढायला लावल्या उठाबशा..!

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा

आपली खासगी गाडी टोलनाक्यावरून सोडली नाही म्हणून दोन दिवसांनी वर्दीत येवून एका आरटीओ अधिकाऱ्याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला अक्षरश: उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे घडला आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्याने घेतलेल्या या बदल्याची खमंग चर्चा सध्या सुरू असून हा संपूर्ण प्रकार सिसिटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, हा अधिकारी नेमका कोण असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

काल सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील पालखी मार्गावरील टोलनाक्यावर बारामतीकडून आरटीओ कार्यालयाची लाल दिव्याची गाडी आली. टोलनाका पास न करताच ही गाडी वळून पुन्हा तिथेच थांबली. त्यानंतर या गाडीत बसलेल्या एका अधिकाऱ्याने टोलवरील कर्मचारी आणि व्यवस्थापकांना बोलावून घेतलं. त्यानंतर त्या दोघांकडे ओळखपत्राची मागणी करून कर्मचाऱ्याला स्वत:च्या गाडीत बसवलं. शेवटी व्यवस्थापकाने मध्यस्थी केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला आरटीओ गाडीतून उतरवण्यात आलं.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्या अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्याला सर्वांसमोर कान धरून उठाबशाही काढायला लावल्या. त्यानंतर काही समजण्याच्या आत पुन्हा ही गाडी बारामतीच्या दिशेने निघून गेली. आता नेमकं काय झालं हे कुणालाच काही कळत नव्हतं. त्यामुळं एकमेकांच्या तोंडाकडे बघण्याशिवाय उपस्थितांकडे पर्यायच नव्हता. शेवटी सगळं शांत झाल्यावर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून हकीकत समजल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दोन दिवसांपूर्वी हे अधिकारी आपल्या खासगी गाडीतून पाटसकडे जात होते. त्यावेळी टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवली गेली. त्यावर त्यांनी आपण आरटीओ अधिकारी असल्याचं सांगितलं. मात्र येथील कर्मचारी संदीप लोंढे यांनी ओळखपत्राची मागणी केली होती. हीच बाब खटकल्यामुळे या अधिकाऱ्याने वर्दीत येवून आपला थाट दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता झडू लागली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकाराबाबत टोलनाका व्यवस्थापक संतोष खापरे यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात माहिती दिली आहे.

दरम्यान, केवळ बदला घेण्यासाठी म्हणून शासकीय वाहन आणि आरटीओ कार्यालयातील अन्य कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन दंडेलशाही करणारा हा अधिकारी नेमका कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. बारामती आरटीओ कार्यालय सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असते. अशातच आता टोलनाक्यावर वर्दीवर जाऊन केलेल्या अरेरावीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

हा तर मस्तवालपणा..!      

वास्तविक टोलनाक्यावर अनेकजण दादागिरी करताना दिसतात. त्यामुळे ओळखपत्र पाहून गाडी सोडणं सोपं जातं. याच उद्देशानं संबंधित कर्मचाऱ्याने ओळखपत्राची मागणी केली असावी. मात्र आपली गाडी सोडली नाही म्हणून जिथे आपला अधिकार नाही अशा ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यावर दादागिरी करणे हा मस्तवालपणा असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यावर वरिष्ठांकडून कारवाई होणार का असाही सवाल उपस्थित होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!