BIG BREAKING : अंतिम एनओसी आणि अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नसलेल्या बारामतीतील अकॅडमी होणार सील; मुख्याधिकाऱ्यांनी दिले अग्निशमन विभागाला आदेश

बारामती : न्यूज कट्टा      

बारामती शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अकॅडमींना बारामती नगरपरिषदेकडून चाप बसणार आहे. अंतिम फायर एनओसी नसलेल्या आणि अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नसलेल्या बारामती शहरातील अकॅडमी तात्काळ सील करण्याचे आदेश मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिले आहेत. ना हरकत दिल्याची मुदत संपलेल्या अकॅडमींची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

बारामती शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अकॅडमी सुरू आहेत. त्यांच्याकडून गुणवत्तेच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. या अकॅडमींवर कारवाई व्हावी यासाठी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी वेळोवेळी आंदोलनं केली. दरम्यानच्या काळात प्रशासनाकडून सर्व विभागांची बैठक घेऊन फायर एनओसी नसलेल्या अकॅडमींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

प्रशासनाच्या आदेशानंतर शहरातील अकॅडमी चालकांनी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत कायदेशीर बाबींची पूर्तता नसतानाही फायर एनओसी मिळवल्या होत्या. त्यावर मोहसीन पठाण यांनी या एनओसीसंदर्भातील कागदपत्रांची माहिती अधिकारात मागणी केली होती. मात्र अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्षभर ही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या फायर एनओसी देताना काहीतरी काळेबरे झाल्याचा संशय व्यक्त करत मोहसीन पठाण यांनी बारामती नगरपरिषदेसमोर उपोषणही केले होते.

पठाण यांना १९ जुलैपर्यंत कागदपत्रे देण्याचे आश्वासन देऊन हे उपोषण थांबवण्यात आले. मात्र त्यानंतरही अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित एनओसीची कागदपत्रे देण्यात विलंब केला जात होता. याबाबत जिल्हाधिकारी, नगरपरिषद विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितल्यानंतर अग्निशमन विभागाकडून मोजकीच कागदपत्रे देण्यात आली. यानंतर मोहसीन पठाण यांनी संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांना आज ना हरकत दिल्याची मुदत संपूनही अंतिम एनओसी न घेतलेल्या आणि अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नसलेल्या अकॅडमी तात्काळ सील करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील सर्व अकॅडमींची तपासणी करून आवश्यक सुरक्षेची पूर्तता होईपर्यंत संबंधित अकॅडमी सील कराव्यात अशा सूचनाही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिल्या आहेत. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!