बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे आणि तालुका पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान या दोघांचीही बदली करण्यात आली आहे. या दोन्ही पोलिस ठाण्यांचा पदभार आता नवीन अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक विलास किसन नाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान यांचीही बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विश्वास सुभाष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील इतरही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
दरम्यान, बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या सध्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सक्षम अधिकारी असावेत अशी मागणी होत होती. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार या दोन्ही पोलिस ठाण्यांना नवीन अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे हे नवीन अधिकारी कशा पद्धतीने काम करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





