पुणे : न्यूज कट्टा
पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांनी तब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील चौघांना पुणे शहर पोलिसांनी अटक केली असून उर्वरीत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींमध्ये वनराज यांच्या बहिणी आणि मेहुण्याचाही समावेश आहे.
पुणे शहरातील नाना पेठेत वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेनंतर वनराज यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची मुलगी संजीवनी कोमकर, तिचा पती जयंत कोमकर, कल्याणी कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, तुषार कदम, सागर पवार, पवन करताल, सॅम काळे यांच्यासह पंधराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जयंत, संजीवनी, गणेश आणि कल्याणी यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांसमोर दिली होती धमकी
बंडू आंदेकर यांच्या फिर्यादीनुसार, मुलगी संजीवनी आणि जयंत हे त्यांच्या दुकानावर दगडफेक केल्यामुळे आकाश परदेशी याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी रविवारी समर्थ पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी आकाशने वनराज आंदेकर, पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर आणि अॅड. मनोज माने यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. या दरम्यान, संजीवनी आणि जयंत यांनी आकाश परदेशी याला पोलिस ठाण्याच्या आवारातच चपलेने मारहाण केली.
ही भांडणे शिवम आंदेकर यांनी सोडवली. त्यानंतर आकाशच्या तक्रारीवरून संजीवनी व जयंत यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. ही बाब खटकल्यामुळे चिडलेल्या संजीवनीने वनराज तुला आम्ही जगू देणार नाही, तू आमच्यामध्ये आला आहेस, आमचे दुकान पाडून आमच्या पोटावर पाय देतोस का..? तुला आज पोरं बोलावून मारतेच अशी धमकी दिली होती.
त्याच रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज व शिवम यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे पळून जात असताना वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हा सर्व प्रकार सुरू असताना समोरच राहणाऱ्या संजीवनी व जयंत कोमकर यांनी बाल्कनीत उभं राहून मारा, मारा, दोघांनाही जीवंत सोडू नका असं म्हणत चिथावणी दिली. या दरम्यान, गोळी लागल्यामुळे खाली पडलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी १४ ते १५ वार केल्याचेही समोर आले आहे.
कौटुंबिक वाद अन् गॅंगवारची किनार..!
या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवत आरोपी निष्पन्न केले आहेत. यामध्ये वनराज यांच्या बहीणींसोबत असलेल्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी पूर्वी आंदेकर यांच्या टोळीत असलेल्या सोमनाथ गायकवाड याचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे वनराज आंदेकर यांच्या हत्येमागे कौटुंबिक वादाबरोबरच गॅंगवारची किनारही जोडल्याचं समोर येत आहे.





