बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या हंगामात गाळप केलेल्या उसाचा अंतिम दर जाहीर केला आहे. गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३६३६ रुपये दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सोमेश्वर कारखान्यापेक्षा ६५ रुपये जादा दर देत माळेगाव हा उच्चांकी दर देणारा कारखाना ठरला आहे.
माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. या बैठकीमध्ये कारखान्याचं मागील वर्षी झालेलं गाळप, साखर उत्पादन यासह उपपदार्थ उत्पादन याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३६३६ रुपये अंतिम दर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला ३५७१ रुपये अंतिम दर जाहीर केला होता. त्यानंतर माळेगाव कारखान्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सोमेश्वरपेक्षा ६५ रुपये अधिकचा दर जाहीर केला आहे. सद्यस्थितीत माळेगाव कारखान्याने जाहीर केलेला अंतिम दर राज्यात उच्चांकी ठरला आहे.





