बारामती : न्यूज कट्टा
उसने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार बारामतीत घडला आहे. आत्महत्येपूर्वी या युवकाने चिठ्ठी लिहीत आपल्याला झालेल्या त्रासाची कैफियत मांडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन महिला व एका पुरुषासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर गोपाळ देवरात (वय ३६, रा. गुणवडी) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी मयत ज्ञानेश्वर यांच्या पत्नी पल्लवी ज्ञानेश्वर देवरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी ज्योती महादेव आगवणे (रा. एकतानगर, बारामती), बाळू केशव कोळेकर आणि नाजनीन राजू शेख (दोघेही रा. कुंभरकरवस्ती, बारामती) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर देवरात यांनी आज आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपण उसने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले म्हणून ज्योती आगवणे व अन्य आरोपींनी आपल्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणात वारंवार त्रास दिला. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिठ्ठीत नमूद व्यक्तींवर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.





