माळेगाव : न्यूज कट्टा
एका युवतीशी मैत्री करणं एका युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. युवतीशी मैत्री केल्यामुळं तिघांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडला आहे. या मारहाणी संबंधित युवकाची कवटी फुटली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर माळेगाव परिसरात खळबळ उडाली असून माळेगाव पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय बाळासाहेब जाधव (वय २९, रा. माळेगाव, ता. बारामती) असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील बाळासाहेब लक्ष्मण जाधव यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, अक्षय जाधव याची एका युवतीशी ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात मैत्री झाली होती. ही बाब खटकल्यामुळे यश राजेंद्र कांबळे, अमित अविनाश कांबळे (दोघे रा. खांडज) व उत्कर्ष दत्तात्रय भोसले (रा. माळेगाव) आणि आणखी तीन अनोळखी व्यक्तींनी त्याला दुचाकीवर बसवून माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मागील बाजूस असलेल्या निरा डाव्या कालव्याजवळ असलेल्या रिकाम्या जागेत नेले.
त्या ठिकाणी आधीच तिघेजण थांबलेले होते. त्यानंतर सर्वांनी मिळून अक्षयला बेदम मारहाण केली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याची कवटी फुटली आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून या घटनेनंतर माळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अक्षयचे वडील बाळासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून यश कांबळे, अमित कांबळे आणि उत्कर्ष भोसले या तिघांसह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेगाव पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





