नाशिक : न्यूज कट्टा
आपल्या नऊ वर्षांच्या मुलीला विषारी औषध पाजून नंतर पती-पत्नीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. शाळेला जाण्यासाठी नात बाहेर आली नाही म्हणून आजोबा पाहायला गेले, तेव्हा हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या हत्या आणि आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पती विजय माणिक सहाने, पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने आणि मुलगी अनन्या विजय सहाने अशी या घटनेत मृत पावलेल्या कुटुंबियांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, विजय सहाने हे नाशिकमधील गौळने गावातील रहिवासी असून ते सध्या नाशिक येथील सराफनगर परिसरात वास्तव्यास होते. आज सकाळी अनन्या हिला नेण्यासाठी स्कूल बस आली होती. मात्र ती खाली आली नाही. त्यामुळे आजोबा तिला बोलवण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
पती विजय व पत्नी ज्ञानेश्वरी यांनी मुलगी अनन्या हिला विषारी औषध पाजले. त्यानंतर या दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सहाने यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, ही बाबही तपासात समोर आली आहे. काल सहाने कुटुंबीय त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनाला जाऊन आल्याचेही निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या कपाटात १० लाख रुपये रोख, सोनं या सर्व वस्तुही सुस्थितीत आहेत. असं असताना त्यांनी जीवन का संपवलं याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणी नाशिकमधील इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली असून संपूर्ण कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.





