पुणे : न्यूज कट्टा
पुणे शहरातील समाधान चौकात रस्त्याला भगदाड पडून पुणे महानगरपालिकेचा टँकर खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. सिटी पोस्ट आवारात ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर तब्बल तीन तासांनी क्रेनचया सहाय्याने हा टँकर बाहेर काढण्यात आला.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकात सिटी पोस्ट कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिकेचा एक टँकर या परिसरातून जात होता. त्यावेळी या रस्त्याला अचानकच भगदाड पडलं आणि हा टँकर खड्ड्यात पडला. टँकर चालकानं वेळीच प्रसंगावधान राखत उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
पेवर ब्लॉकच्या सहाय्याने बनवलेला रस्ता खचल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तांसानंतर क्रेन बोलावून हा टँकर बाहेर काढण्यात आला आहे.





