पुणे : न्यूज कट्टा
माहेरहून सोन्याचे दागिने आणि पैसे आणावेत यासाठी सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे या विवाहितेच्या अन्नात विष कालवून तिला दोनवेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती, सासू, नणंद आणि दीर अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरी मनोज गायकवाड (वय ३६, रा. अहिल्या सोसायटी, येरवडा) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी उज्वला रमेश आडागळे ( वय ५३, रा. कमेला, कोंढवा ) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती मनोज सुरेश गायकवाड (वय ३७), सासू मंदा सुरेश गायकवाड (वय ५६), नणंद रेखा कांबळे (वय ४५), दीर आकाश सुरेश गायकवाड (वय २६, हे सर्व रा. अहिल्या सोसायटी, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, गौरी हिचा मनोज गायकवाड याच्याशी विवाह झालेला होता. सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर पती, सासू, नंणद, दीर हे वेळोवेळी क्षुल्लक कारणांवरून त्रास देत असत. तू माहेरी निघून जा, तुला काही काम येत नाही असं म्हणत हिणवलं जात होतं. तसेच माहेरहून दागिने आणि पैसे आणावेत यासाठीही तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.
दरम्यानच्या काळात तिच्या अन्नात विष कालवून तिला दोन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच अनेकदा तिला जीवे मारण्याची धमकीही दिली जात होती. या सर्व त्रासाला कंटाळून दि. २० सप्टेंबर रोजी तिने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.





