पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा
आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पतीने स्वत:च्या पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. या प्रकरणी पती आणि सासऱ्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पीडितेवर सावत्र सासऱ्यानेही लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कासारवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. ८ मार्च २०२२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पीडितेच्या पती आणि सासऱ्याने एक अॅप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितलं. त्यानंतर एका ग्राहकाने या अॅपच्या माध्यमातून संपर्क साधल्यानंतर या पीडितेला पती आणि सासऱ्याने वेश्या व्यवसायासाठी जाण्यास भाग पाडलं.
सातत्याने हा प्रकार सुरू झालयानंतर येणाऱ्या पैशातून घराचा खर्च भागावला जाऊ लागला. या प्रकाराला पीडितेने विरोध केला. मात्र तिला मारहाण करत हे दुष्कृत्य करण्यास भाग पाडलं. याचदरम्यान, पीडितेच्या सावत्र सासऱ्यानेही तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीनंतर भोसरी पोलिसांनी पती आणि सावत्र सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास भोसरी पोलिस करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पिंपरी चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





