बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील शिरवलीत रविरात्री रात्री सशस्त्र दरोड्याचा प्रकार घडला आहे. शस्त्राचा धाक दाखवत ९ लाख ८० हजार रुपये रोख आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बारामती तालुक्यातील शिरवली येथे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तलवारी, गज आणि दांडक्यांचा धाक दाखवत ९ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि चार तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे येथे असलेल्या इरटीगा या कारचीही तोडफोड करण्यात आली असून प्रतिकार करण्यासाठी गेलेले पाचजण यामध्ये जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर माळेगाव पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे. माळेगाव पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर बारामती तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.





