धायरी : न्यूज कट्टा
दारू पार्टी झाल्यानंतर जेवण करताना ताटात हात घालून का खातो या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा लाकडी बांबू आणि दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना पुण्यातील धायरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य घोरपडे (वय २१, रा. घोरपडे चाळ, धायरी) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आकाश ऊर्फ नन्या परदेशी, त्याचा सावत्र भाऊ सुरेश शुक्ला आणि अन्य तीन मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आदित्य याची आई राजश्री संतोष घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. धायरी येथील रस्त्यालगत पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य घोरपडे आणि त्याचे मित्र नर्हे येथील गॅलक्सी रेस्टो बार येथे दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिऊन झाल्यानंतर त्यांनी जेवण मागवले. जेवण सुरू असताना एकमेकांच्या ताटात हात घालून जेवण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत असल्यामुळे या सर्वांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यानंतर आदित्य आपल्या घराकडे जात असताना आकाश व त्याच्या मित्रांनी लाकडी बांबू आणि दगडाने मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आदित्यचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अमोल झेंडे, निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अतुल भोस यांच्यासह इतर अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, आदित्यच्या खूनानंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.





