मुंबई : न्यूज कट्टा
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर काल कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या घडवून आणल्याची पोस्ट सोशल मिडियात व्हायरल झाली होती. आता या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर येत असून मुंबई पोलिसांनी पुण्यातून एकाला अटक केली आहे. प्रवीण लोणकर असं या आरोपीचं नाव आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड फायर करण्यात आले. यातील तीन राऊंड लागल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना अटक केली होती.
त्यानंतर काल दुपारी शुब्बू लोणकर नावाने सोशल मिडियात व्हायरल झालेल्या पोस्टमधून लॉरेन्स बिश्नोई गॅंगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. त्यामध्ये या हत्येचं पुणे कनेक्शन समोर आलं असून मुंबई पोलिसांच्या पथकानं पुण्यातून प्रवीण लोणकर याला अटक केली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सोशल मिडियात पोस्ट करणाऱ्या शुब्बू उर्फ शुभम लोणकर याचा प्रवीण हा भाऊ आहे. शुभम आणि प्रवीणने धर्मराज कश्यप आणि शिवानंद या दोन आरोपींना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी निवडल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून फरार असलेल्या शुभम लोणकर यांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवानंद एका भंगाराच्या दुकानात काम करत होते. या दुकानाच्या बाजूलाकच प्रवीण लोणकर याचं दुकान असल्याची माहिती समोर येत आहे.
बिश्नोई गॅंगकडून फेसबुक पोस्ट..?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शुब्बू लोणकर या नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.





