पुणे : न्यूज कट्टा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रॅव्हल्स बसमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दुसरीकडे या अपघातात कार आणि ट्रॅव्हल्स बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राजश्री मुंडे या पुणे-सोलापूर महामार्गावरून मुंबईकडे जात होत्या. पहाटेच्या वेळी सोरतापवाडी येथे त्यांच्या कार आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काही काळ पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरु केलं.
दरम्यान, या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर तातडीने जवळच असलेल्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्या प्राथमिक उपचारानंतर मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. पोलिसांनी या अपघाताची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.





