इंदापूर : न्यूज कट्टा
राजकीय घडामोडींमुळे राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदापूरमधून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून आमदार दत्तात्रय भरणे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दत्तात्रय भरणे यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. दरम्यान, इंदापूरमधील राजकीय घडामोडींवर अजितदादा काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील राजकारणात इंदापूर विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील सख्य अवघ्या राज्याला ज्ञात आहे. अशातच अजितदादांनी भाजप-सेना युतीत सहभाग घेतला. त्यामुळे इंदापूरमधील राजकीय गणिते बदलली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा उमेदवार कोण यावरून पेच निर्माण झाला होता.
लोकसभा निवडणुकीवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याच मुद्यावरून महायुतीच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून तोडगा काढल्यानंतर हर्षवर्धन पाटील लोकसभा निवडणुकीत सक्रिय झाले. त्यानंतर मात्र पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत तुतारी हाती घेतली. त्यानंतर आता इंदापूरमधून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे.
दत्तात्रय भरणे हे शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भरणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: अजितदादाही उपस्थित राहणार आहेत. या निमित्तानं दत्तात्रय भरणे यांच्याकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजकीय घडामोडीनंतर अजितदादा प्रथमच इंदापुरला येत आहेत. त्यामुळे ते या सर्व घडामोडींवर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





