इंदापूर : न्यूज कट्टा
भाजपला रामराम करत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खा.सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी १० वाजता वाघ पॅलेस येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला आहे. त्यानुसार गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी हर्षवर्धन पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी १० वाजता इंदापूर शहरातील वाघ पॅलेस येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवेशाच्या कार्यक्रमातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.





